कार्तिक महिन्यात गावोगावी मंदिरांतून पहाटेच्या वेळी काकड आरतीचे मंगल
सूर आपल्याला ऐकू येतात. काकड आरतीच्या वेळी जे भजन होते त्या भजनात
भगवंताची आर्त स्वरात विनवणी करणारे भुपाळीचे अभंग पारंपारीक वारकरी
चालीत म्हंटले जातात. हे अभंग पहाटेच्या समयी ऐकणे हा एक विलक्षण
अनुभव असतो. या भुपाळीच्या अभंगातील तुकाराम महाराजांचा हा एक गोड
अभंग –
कामें नेलें चित्त नेदीं अवलोकु मुख । बहु वाटे दु:ख फुटो पाहें हॄदय ॥१॥
कां गा सासुरवासी मज केलें भगवंता । आपुलियां सत्ता स्वाधिनता तें नाही ॥२॥
प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना । येथें न चलें चोरी उरली राहे वासना ॥३॥
येथे अवघें वायां गेलें दिसती सायास । तुका म्हणे नाश दिसें झाल्या वेचाचा ॥४॥
या अभंगातून तुकाराम महाराज भक्तीमार्गातील एका अवघड पेचाची देवाकडे
तक्रार मांडतात.
कामनांचा, आशा, इच्छा, आकांक्षांचा पूर्ण नाश झाल्या शिवाय भगवंताचे दर्शन
होत नाही. आपल्या मनात काही कामना घेवूनच आपण देव दर्शनाला जातो.
किंबहूना देव दर्शन महत्वाचे नसतेच मूळी, आपली कामना देवाने पूर्ण करावी
हीच आपली इच्छा असते. कुणाला धनाची कामना असते तर कुणाला सत्तेची.
कुणाला मुलगा हवा असतो तर कुणाला मुलगी हवी असते. कुणाला नोकरी
हवी असते तर कुणाला छोकरी. कुणाला आत्मज्ञान हवे असते तर कुणाला
मोक्षसुख. आपल्या मनामध्ये पैशाची आकांक्षा घेवून आपण देव दर्शनाला
गेलो तर आपल्याला देवाच्या जागी पैशांचेच दर्शन होते. तसेच कोणत्याही
कामनेचे आहे.
भक्त तर ’ नलगे मुक्ती धन संपदा ।’ म्हणत मोक्ष देखिल नाकारतात. ज्याने
सर्व आशा, कामनांचा त्याग केला आहे तोच खरा भक्त होय. तुकाराम महाराजांनी
भक्ताची व्याख्या करताना म्हंटले आहे –
भक्त ऐसे जाणा जे देही उदास । गेले आशापाश निवारोनी ॥
स्वत: तुकाराम महाराज तर सर्व कामना रहित झाले होते.
काम नाही काम नाही । झालो पाही रिकामा ॥
असे स्वत:चे वर्णन त्यांनी केले आहे. पण तरिही तुकाराम महाराज या अभंगात
काय म्हणतात पाहा –
कामें नेलें चित्त नेदीं अवलोकु मुख । बहु वाटे दु:ख फुटो पाहें हॄदय ॥१॥
देवा, माझ्या मनाला कामनेने ग्रासून टाकले आहे. त्यामुळे तुझे मुख मी पाहू
शकत नाही. त्यामुळे माझे हृदय दु:खाने फुटून जाईल असे वाटते.
आनंदाचे डोही – ०१ / ०२
आपल्या दु:खाचे वर्णन तुकाराम महाराज पुढे करतात –
कां गा सासुरवासी मज केलें भगवंता । आपुलियां सत्ता स्वाधिनता तें नाही ॥२॥
तुकाराम महाराज देवाला विचारतात की हे भगवंता मला सासुरवासी का
केलेस? आता मी स्वतंत्र राहिलो नाही. माझी माझ्यावरच सत्ता राहिली नाही.
महाराजांनी दिलेला सासूरवासाचा दृष्टांत जुन्या काळातला आहे. सासू सून
यांचे नाते कसे असते? सासू म्हणजे सारख्या सूचना तर सून म्हणते
सूचना नको. सासू सूनेतील सत्ता संघर्ष फार जूना आहे. आजही तो काही घरांत
पहायला मिळतो. पूर्वीच्या काळात या संघर्षात बहूधा सासूचाच विजय होत असे.
घरात सासूची सत्ता असे. सून पारतंत्र्यात असे.
या संदर्भात जुने किर्तनकार एक गंमतीचा दृष्टांत देत असत.
ठमाकाकु आणि शांती या सासू सूना. ठमाकाकू एकदा बाजारात गेल्या होत्या.
घरात शांती एकटीच होती. त्याचवेळी रमाकाकू तीथे आल्या. “अग शांती
विरजणासाठी चमचाभर दही देतेस काय?” रमाकाकूनी मागणी केली.
“नाही हो रमाकाकू काल रात्रीच सगळे दही संंपले. भांडीही घासून ठेवलीत.”
रमाकाकू परतल्या. वाटेत त्यांना ठमाकाकू भेटल्या. रमाकाकूनी सर्व प्रसंग
त्यांना सांगितला. ठमाकाकू भडकल्या. “वेंधळी मेली! ही कोण सांगणारी
घरात काय आहे आणि काय नाही ते. तूम्ही चला माझ्याबरोबर.”
असे म्हणून ठमाकाकू रमाकाकूना आपल्या घरापर्यंत घेवून आल्या. घराच्या
दारात येताच ठामाकाकू म्हणाल्या, ” हे बघा रमाकाकू, विरजणाला दही नाही हो
घरात.” असे म्हणून ठमाकाकू घरात शिरल्या त्या शांतीचा उद्धार करत.
रमाकाकू ठमाकाकूकडे पहातच राहिल्या.
हेच तर शांतीने सांगितले होते. पण हे सांगण्याचा हक्क सूनेचा नव्हे सासूचा
बर का.
पारतंत्र्याचे दु:ख फार मोठे असते. विशेषत: ज्याने पूर्वी स्वातंत्र्याचे सुख
अनुभवले आहे, त्याला तर ते जास्तच त्रास देते. एखाद्या श्रीमंत माणसाला जर
गरिबी भोगायला लागली तर त्याला जास्त दु:ख होते, तसेच हे आहे. जीव हा
परमात्म्याचा अंशच. पूर्वी परमात्म स्वरूपात असताना हा पूर्ण स्वतंत्र होता.
सर्व सत्ता उपभोगत होता. पण जीवदशा प्राप्त होताच तो परतंत्र झाला.
“या पारतंत्र्यात देवा मला का घातलेस?” असा महाराजांचा देवाला सवाल आहे.
आनंदाचे डोही – ०१ / ०३
भगवंता, तू देव झालास आणि आम्हाला भक्त (जीव) केलेस. नाहितर भक्तीचा
खेळ कसा खेळणार ? पण या जीवपणामुळे हे सासूरवासाचे दु:ख आमच्य़ा
वाट्याला आले. आम्ही अनेक प्रयत्न करून आमच्या सर्व वासनांवर, कामनांवर
विजय मिळवला. पण आम्ही जीव असल्याने पूर्ण स्वतंत्र नाही. त्यामुळे एक
कामना शिल्लक राहिलीच. ती कोणती पाहा –
प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना । येथें न चलें चोरी उरली राहे वासना ॥३॥
देवा पहाटेच्या या शांत, मंगल वेळी तुझ्या दर्शनाला यावे अशी कामना मात्र
शिल्लक राहिली. ही वासना कशी आणि कोणापासून लपवू ? येथे चोरी लपवता
येत नाही. कारण तूम्ही सर्वसाक्षी आहात.
न सांगता तुम्हा कळो येते अंतर । विश्वी विश्वंभर परिहारची नलगे ॥
तुम्हाला आमच्या मनात काय चालले आहे हेही कळते. देवा मी तरी काय करु ?
तुकाराम महाराज आभंगाच्या शेवटच्या चरणात आपली अगतिकता प्रकट करताना
म्हणतात –
येथे अवघें वायां गेलें दिसती सायास । तुका म्हणे नाश दिसें झाल्या वेचाचा ॥४॥
येथे मी जे जे कामना जयाचे प्रयत्न, सायास केले ते सर्व वाया गेले. सर्व परिश्रमाचा
नाश झाला.
भक्तिमार्गातील एक गोड कोडे तुकाराम महाराज या अभंगात मांडतात. भक्ताच्या (जीवाच्या)
सर्व कामना नष्ट झाल्या तर तो देवच होईल. पण भक्ताला आपले भक्तपण तर सोडायचे
नाही आणि वासनांवर विजय मात्र हवा.
– देवदत्त परुळेकर