विष्णुबुवा जोग महाराज यांची आज पुण्यतिथी (गुरुप्रतिपदा)
त्यांना भावपूर्ण आदरांजली.
ते नाशिकला रामकुंडावर स्नानासाठी गोदावरीमध्ये उभे राहिले. तीरावरील
तीर्थोपाध्याय संकल्प सांगू लागला –
” पापोहं पापकर्माहं पापात्मा पापसंभव: ॥
बुवा एकदम त्याच्यावर खेकसले.
“मी पापीही नाही, पापकर्मीही नाही ! दुसरे काय म्हणायचे असेल ते म्हणा,
एवढा हा संकल्प उच्चाराल, तर खबरदार !”
कोण होते हे बुवा ? या दुर्लभ संत पुरुषाला विष्णुबुवा जोग या नावाने
ओळखतात. त्यांचा हा अल्प परिचय –
विष्णु नरसिंह जोग (जन्म : १४ सप्टेंबर १८६७, मृत्यू ५ फेब्रुवारी १९२०)
हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे कार्य पद्धतशीरपणे पुढे नेण्याचे प्रयत्न करणारे
संतपुरुष होते. विष्णुबुवा जोग म्हणून हे सर्वपरिचित आहेत.
ते आळंदीतील वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार
आणि लेखक होते. विष्णुपंत जोग हे अत्यंत निरिच्छ होते आणि
लोकमान्य टिळक यांचे स्नेही व चहाते होते. ते स्वदेशी वस्तू वापरीत
आणि टिळकांना यथाशक्ती मदत करीत.
विष्णुबुवांचा जन्म पुण्यात झाला. त्यांच्या आईचे नाव सरस्वती होते.
त्यांना तीन मोठे भाऊ होते. त्यांतील एक पांडोबा महाराज हे मल्ल होते.
विष्णुबुवांनाही लहानपणापासून मल्लविद्येचा नाद होता. पांडोबांप्रमाणे तेही
आजन्म ब्रह्मचारी राहिले. विष्णुबुवा पुण्यातील नगरकर तालमीचे वस्ताद होते.
पांडोबा महाराजांबरोबर विष्णुबुवा आळंदीला जाऊन लागले. हळुहळु ते
ज्ञानेश्वर माऊली व पांडुरंगाचे नि:स्सीम भक्त झाले.
त्यांनी तुळसिची माळ ज्ञानेश्वरांच्या समाधीवर ठेवली. ती माळ स्वतःच
आपल्या गळ्यात घालून घेतल्री आणि ते वारकरी झाले.
विष्णुबुवा जोगमहाराज हे वारकरी संप्रदायाचे प्रसारक होते.
विष्णुबुवा फारसे शिकलेले नव्हते. त्याना स्वत:ची सही करायलाही दोन मिनीटे
लागत असत. पण संत कृपेने मराठी संतवाङ्मयाचे अनेक ग्रंथ त्यांनी
टिपा-प्रस्तावना-अन्वयार्थ लावून प्रसिद्ध केले.
तुकाराम महाराजांच्या अभंगांचा अर्थ लावून सार्थ गाथा तयार करण्याचे काम
पहिल्यांदा जोगमहाराजांनीच केले. इ.स. १९०१ साली त्र्यंबक हरि आवटे
यांनी प्रकाशित केलेली हीच ती तुकारामाची आद्य सार्थ गाथा.
जोग महाराजांनी संपादित केलेली अन्य पुस्तके
सार्थ अमृतानुभव (इ.स. १९०५).
निळोबा महाराजांचा व ज्ञानेश्वर महाराजांचा वर्गीकृत गाथा ( १९०७)
सार्थ हरिपाठ आणि चांगदेव पासष्टी
एकनाथी भागवतादी सहा ग्रंथ (१९११)
वेदान्तविचार (१९१५)
महीपतीकृत ज्ञानेश्वरीतील वेचे (सार्थ) (१९१७)
जोग महाराजांनी गावोगावी फिरून कीर्तने-प्रवचने दिली आणि आपल्या
अमोघ वाणीने संत वाङ्मयाचा प्रचार आणि प्रसार केला. भजन, कीर्तने,
ज्ञानेश्वरी आणि तुकारामाची गाथा यांची पारायणे आणि पंढरीची वारी हा
त्यांचा दिनक्रम बनला. कीर्तन-प्रवचनांनी त्यांनी महाराष्ट्र ढवळून काढला.
विष्णुबुवा अत्यंत नियमशील वारकरी होते. आचरण विशुद्ध, सत्यप्रियता,
देशभक्ती अशा अनेक गुणांनी जोगमहाराजांना समाजात मान होता, प्रतिष्ठा
होती. अनेकांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना होती.
जोगमहाराजांचे शिष्योत्तम वै. प्राचार्य सोनोपंत (मामा) दांडेकर यांनी
जोगमहाराजांचे चरित्र लिहून प्रसिद्ध केले आहे. मामांबरोबरच
वै. बंकटस्वामी, वै. लक्ष्मणबुवा इगतपुरीकर, वै. मारुतीबुवा गुरव,
वै. पांडुरंग शर्मा, वै. लक्ष्मणबुवा कुंडकर असे अनेक कतृत्ववान शिष्य
जोग महाराजांनी तयार केले. त्यांनी वारकरी सांप्रदायाचा मोठा प्रसार
केला. तसेच प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार वै. डॉ. दत्तोपंत पटवर्धन हे देखिल
जोग महाराजांचेच शिष्य होत.
जोग महाराजांच्या जीवनातील काही प्रसंग –
(वै. मामा दांडेकर यांनी लिहिलेल्या चरित्रच्या आधारे)
हरिकीर्तन करुन कुणी पैसे घेवू लागला की ते त्याच्यावर संतापत.
“तर मग पोट भरण्यासाठी मी काय करु ?” या प्रश्नावर ते लगेच
उत्तर करीत, “-वाटेल ते कर! हमाली केलीस तरी चालेल. पण
हरिनाम असे विक्रिस काढू नकोस.”
इंग्रजांची (सरकारी) नोकरी करणे या गोष्टीचा ते अतिशय तिटकारा करित.
तुकाराम महाराजांच्या म्हणण्या प्रमाणे –
आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत । करावे फजीत चुकती ते ॥
असे त्यांचे वर्तन होते. कुणी चुकीच्या मार्गाने जाऊ लागला, की
त्यांनी त्याला धरुन चमकावलाच. जाऊ दे, आपल्याला काय करायचे आहे,
अशी चालढकल त्यांच्याजवळ अजिबात नव्हती, ढोंग दिसले की आपली
काठी घेऊन ते त्याच्यावर तुटून पडलेच !
विदर्भातील एक तथाकथित साधू पुण्यास आले. त्यांनी अंतर्दुष्टीने एका
भल्या माणसाची विधवा ही गेल्या जन्मी आपलीच पत्नी होती, असे
ओळखले होते म्हणे ! पुण्यातील एका सत्प्रवृत्त देशभक्तांनीच त्यांचे
प्रस्थ वाढविण्यास प्रारंभ केला. बुवा उठले आणि दण्डा घेऊन त्या
साधूच्या मुक्कामी जाऊन उभे राहिले. त्यांनी त्या साधूला असे खडसावले,
की लगेच गाशा गुंडाळून तो जो पळाला, तो बुवा असे पर्यंत पुन: पुण्यास
आला नाही.
आपली सर्व संपत्ती बुवांनी वारकरी शिक्षण संस्थेला दिली.
बुवा स्वत: पत्र लिहीत नसत. कधी लिहिण्याचा प्रसंग आला तर
दुसऱ्याला सांगत. एकादा मामांवर पत्र लिहिण्याचा प्रसंग आला.
ते लिहीत असताना नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे पत्राच्या शेवटी ’आपला’
असे मामांनी लिहिले आणि बुवांपुढे सहीकरता कागद केला. बुवा
म्हणाले हे ’आपला’ खोड. आम्ही फक्त ज्ञानदेवाचे आणि देवाचे !
पुन: कधी मामांनी ’आपला’ असे बुवांच्या पत्रात लिहिले नाही.
आपला देह आळंदी येथेच अखेर ठेवायचा हा बुवांचा निर्धार होता.
त्याप्रमाणे ते आदल्या दिवशी निघून मामा दांडेकर व लक्ष्मणबुवा इगतपुरीकर
यांचेबरोबर पुण्याहून घोडा गाडीने आळंदीस आले. घांसवालेंच्या धर्मशाळेत
ते उतरले. मामांना इंद्रायणींचे व ज्ञानोबा माऊलींचे तीर्थ आणावयास
सांगितले. ते तीर्थ आणल्यावर जोग महाराजांनी ते प्राशन केले. जोग महाराज
उत्तरेकडे तोंड करुन मांडी घालून बसले. मामांना हाक मारली व डोळे
मिटून मी जातो असे म्हटले. माऊलीच्या चिंतनात ते अनंतात विलीन झाले.
ज्ञानेश्वरीत वर्णन केल्याप्रमाणे त्यांनी देह ठेवला.
का झांकलीये घटीचा दिवा । नेणिजे काय जाहला केव्हां ।
या रिती तो पांडवा । देह ठेवी ॥ ज्ञा. ८-९८ ॥
– देवदत्त परुळेकर मो. ९४२२०५५२२१