Category Archives: Uncategorized

तुकाराम होणे

Tukaram Stamp

आज तुकाराम बीज. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी
विनम्र अभिवादन.
तुकाराम होणे

विठ्ठल होणे सोपे आहे
कठीण तुकाराम होणे
मंबाजीची काठी खाणे
त्याचे हात कुरवाळणे

कठीण दुष्काळ सोसणे
रोखे इंद्रायणी बुडविणे
गोदाम जनात लुटविणे
आपुले दिवाळे काढणे

कठीण भंडारी एकांत
सोयरे वनचरा होणे
अंगी वृक्षवल्ली हो‌ऊन
डो‌ई पाखरू बसणे

कठीण दैवासी हासणे
आ‌ई बाप गमावणे
पत्नी पुत्रा अग्नी देणे
विठो चरणी विसावणे

कठीण भजनाचा नाद
किर्तनी ब्रह्मीभूत काया
नाम धरुनिया कंठी
देवा ऋणी करुनी ठेणे

कठिण जनांसी उपदेश
नाठाळाचे माथी काठी
गाथा इंद्रायणी बुडविणे
जन गंगेत तारणे

कठीण पालखी त्यागणे
नजराणा माघारी झाडणे
इंद्रियांचा स्वामी होणे
गोसावीपण उपभोगणे

– देवदत्त परुळेकर मो.९४२२०५५२२१

हर्षयुक्त उमापती

Shiv

आज महाशिवरात्री
शिवाचे वर्णन करणारा संत नरहरी सोनार महाराजांचा हा
लोकप्रिय अभंग आहे –

भस्म उटी रुंडमाळा । हातीं त्रिशुळ नेत्रीं ज्वाळा ॥ १ ॥
गज चर्म व्याघ्रांबर । कंठीं शोभे वासुकी हार ॥ २ ॥
भूतें वेताळ नाचती । हर्षयुक्त उमापती ॥ ३ ॥
सर्व सुखाचें आगर । म्हणे नरहरी सोनार ॥ ४ ॥

या अभंगात महाराज शिवाच्या रुपाचे तसेच स्वरुपाचेही वर्णन
करतात. कसा आहे तो महादेव ? नरहरी सोनार महाराज
वर्णन करतात –

भस्म उटी रुंडमाळा । हातीं त्रिशुळ नेत्रीं ज्वाळा ॥ १ ॥

शिवाने भस्माची उटी अंगाला फासली आहे. शंकर हा स्मशानात
राहणारा, भस्माची उटी अंगाला फासणारा देव म्हणून प्रसिद्ध आहे.
काय आहे याचे रहस्य ?
आपल्या पुराणांत ब्रम्हा हा सृष्टीचा निर्माता, विष्णु हा सृष्टीचे
पोषण करणारा तर शिव हा सृष्टीचा विनाश करणारा देव अशी
त्रयी मानलेली आहे. अर्थात शिवाचे कार्यक्षेत्र मृत्यूशी संबंधीत
असल्याने त्याचे वास्तव्य स्मशानात असते आणि तो चिताभस्म
अंगाला फासतो. शिव या आपल्या कृतीतून आम्हाला काय संदेश
देतो?
मृत्यू हे मनुष्य जीवनाचे सर्वात प्रखर आणि सर्वात स्पष्ट असे
वास्तव आहे. परंतू कित्येकवेळा आपण कसे वागतो ?
महाभारतात यक्षाने धर्मराज युधिष्ठीराला जे प्रश्न विचारले त्या
सुप्रसिद्ध प्रश्नातील एक प्रश्न असा आहे –
“जगातील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट कोणती ?”
धर्मराजाचे उत्तर मोठे मार्मिक आहे. धर्मराजा म्हणतो, “जगात
पदोपदी मृत्युचे दर्शन होत असतानाही मनुष्य आपण जणू अमर
आहोत अशा थाटातच वावरत असतो, हेच सर्वात मोठे आश्चर्य
होय.”
आपण आज ना उद्या स्मशानातच जाणार आहोत. तीच आपली
शेवटाची नक्की जागा आहे. एक ना एक दिवस आपलेही भस्म
होणार आहे. या सर्वाची आठवण शिव आपल्याला करुन देत आहे.
आपण जर सदैव मृत्युची आठवण ठेवली, प्रत्येकाचा मृत्यू अटळ
आहे आणि मृत्यू केव्हा येईल हे सांगता येत नाही याचे स्मरण
ठेवले तर आपण कोणतेही वाईट कर्म, दुष्कर्म करणार नाही.
पाप कर्मापासून आपण दूर राहू.
एकनाथ महाराज दररोज गोदेत स्नान करावयास जात. वाटेत एक
माणूस नाथांना दररोज शिव्या देत असे. नाथांच्या पत्नी गिरीजाबाईंना
हे सहन होईना. एकदा त्यांनी नाथांकडे या विषयी तक्रार केली.
नाथांनी हा प्रकार बंद करावयाचे आश्वासन गिरीजाबाईंना दिले.
दुसऱ्या दिवशी नाथ स्नानाला जाताना थेट त्या गॄहस्थाच्या घरी
गेले. नाथांना थेट आपल्या घरी आल्याचे पाहून तो गडबाडला.
नाथ त्याला म्हणाले, “तुम्हाला सावध करायला आलो. आज
सूर्यास्ताबरोबर तुमचा मृत्यू होणार आहे.” असे सांगून नाथ स्नानाला
निघून गेले. या गृहस्थाची आता पाचावर धारण बसली. तो खूप
घाबरला. त्याला पश्चात्ताप झाला. त्याने भजनी मंडळ बोलावले.
भजन करु लागला. तोंडातून शिव्या येणे बंद झाले आणि देवाचे
नाम येवू लागले. संध्याकाळी नाथ त्याच्या घरी गेले. त्याने नाथांच्या
पायावर लोळण घेतली. अपराधाबद्दल क्षमा मागितली. येवढ्यात
सूर्यास्थ झाला. नाथ त्याला म्हणाले, “आपण अजून जिवंत कसे ?
हाच प्रश्न तुला पडला असेल. अरे तो दूर्वर्तनी शिव्या घालणारा
गृहस्थ आता मेला. आता तू मृत्यूची कायम आठवण ठेव म्हणजे
शिव्या घालयला तुला वेळच मिळणार नाही.”

शिवाच्या गळ्यात रुंडमाळा आहे. मस्तक हे जीवाचे प्रतिक आहे.
जो आपला जीव देवाला अर्पण करतो, त्याला देव आपला म्हणतो.
तुकाराम महाराज म्हणतात – “जीव दिला पायातळी ।”
याचा अर्थ महाराजांनी देवाच्या पायावर डोके फोडून जीव दिला,
असा नव्हे. ’जीव दिला’ याचा अर्थ सारा अहंकार, सर्वस्व त्या देवाला
अर्पण केले. आता त्या भक्ताच्या मस्तकात तोच परमात्मा भरलेला
आहे. अशा भक्तांच्या मस्तकांची माळ करून मोठ़्या प्रेमाने शिव
आपल्या कंठी धारण करतो.

शिवाच्या हातात त्रिशूळ आहे. त्रिशूळाची तीन पाती सत्व, रज व तम
या त्रिगुणाची प्रतीक आहेत. या त्रिगुणांवर शिवाची सत्ता चालते.

शिवाच्या नेत्रात ज्वाळा आहेत. शिवाला त्रिनेत्र असेही म्हणतात.
या तिसऱ्या डोळ्यात ज्ञानाग्नी आहे. जेव्हा हा ज्ञानाग्नी जागृत होतो
तेव्हा तो सर्व विकारांचा नाश करतो. ही दृष्टी शिव देतो. म्हणून
या ज्ञानाग्नीच्या ज्वाळांनी शिवाने कामदेवाला जाळून टाकले अशी
कथा आहे.

गज चर्म व्याघ्रांबर । कंठीं शोभे वासुकी हार ॥ २ ॥

शिवाने गजचर्म आणि व्याघ्रांबर धारण केले आहे. हत्ती हा कामाचे
तर वाघ हा क्रोधाचे प्रतिक मानतात. यांची साल काढून त्यांच्यावर
शिवाने विजय प्राप्त केला आहे. कंठामध्ये शिवाने वीषयुक्त वासुकी
सर्पाचा हार धारण केला आहे. सर्प वीषयुक्त आहे पण शितल आहे.
तो थंड रक्ताचा प्राणी आहे. समुद्र मंथनाच्या प्रसंगी शिव हलाहल
वीष प्याला आणि ते वीष आपल्या कंठी धारण केले. त्यामुळे होणारी
आग शांत करण्य़ासाठी सर्प गळ्यात धारण केला. वीषावर वीषच
औषध म्हणून उपयोगी ठरते. जो विषम परिस्थितीत न डगमगता
वीष पचवतो, तोच खरा नेता होवू शकतो. तोच महादेव होतो.

भूतें वेताळ नाचती । हर्षयुक्त उमापती ॥ ३ ॥

शिवाचे गण भुते, वेताळ नाचताहेत. स्वामी विविकानंदांच्या सुप्रसिद्ध
शिष्या भगिनी निवेदिता म्हणतात, “भुते, पिशाच्च ही सर्वात खालच्या
योनीचे प्रतिक आहे. म्हणूनच शिव समाजातील सर्वात खालच्या
स्तरावरील लोकांचा लाडका देव आहे. तो सर्वांना आश्रय देतो.”

हा उमापती शिव हसतो आहे. शिव एकटा आहे की दुकटा ?
शिव आणि त्याची शक्ती उमा भिन्न नाहीतच मूळी. शिव या शब्दातील
इकार म्हणजे शक्ती होय. हा इकार दूर केला तर शव उरेल.
शिव हा अर्धनारी नटेश्वर नटराज आहे. तो या त्रिगुणात्मक विश्वाच्या
उत्पत्ती, स्थिती, लयाचे नृत्य अखंड करतो आहे. नृत्य जसे नर्तकापासून
भिन्न करता येत नाही तसे विश्व शिवापासून भिन्न करता येत नाही.
पण नृत्य संपले तरी नर्तक शिल्लक राहतो हे लक्षात ठेवायला हवे.

सर्व सुखाचें आगर । म्हणे नरहरी सोनार ॥ ४ ॥

असा हा शिव सर्व सुखाचे आगर आहे असे नरहरी सोनार महाराज
अभंगाच्या शेवटी म्हणतात. ही ओळ ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगाची
आठवण करून देते.
सर्व सुखाचे आगर । बापरखुमादेवीवर ॥
वारकरी सांप्रदायाप्रमाणे हरी आणि हरात भेद नाही. तो विठ्ठल आणि
शंकर एकच आहेत. त्या परमेश्वराच्य़ा चरणीच सर्व सुख आहे, याविषयी
सर्व संतांचे एकमत आहे. म्हणून सर्व सुखाच्या प्राप्तीसाठी त्या शिवाला
शरण जाऊ या.

– देवदत्त परुळेकर मो. ९४२२०५५२२१

नरहरी सोनार हरीचा दास

NS Samadhi Mandir NS

आज संत नरहरी सोनार महाराज यांची पुण्यतिथी (माघ वद्य तृतिया).
त्यांना भावपूर्ण आदरांजली.

वारकरी संत मंडळात विविध जातीजमातीचे संत आहेत. विविध व्यवसाय
करणारेही संत आहेत. बहुतेक संत प्रपंच करीत परमार्थ साधनाही करीत
होते. गोरा कुंभार, सावता माळी, सेना न्हावी यांच्या नावातच त्यांचा
व्यवसायही दडला आहे. नरहरी महाराज हे सुवर्णकार जातीतले होते.
वाड्‌.मयेतिहासात त्यांचा ’नरहरी सोनार’ असा उल्लेख केला जातो.

यादवकालात शिवाचे उपासक ’शैव’ आणि विष्णूचे उपासक ’वैष्णव’ या
दोन्ही संप्रदायांचा विशेष प्रभाव होता. या दोन्ही संप्रदायांतील जे
स्वमताभिमानी होते, त्यांच्यापैकी काही जणांमध्ये अन्य मतांबद्दल व
संप्रदायाबद्दल दुरावाही होतो. ज्ञानेश्वर माऊलींनी शिव आणि विष्णू ही
एकाच परमेश्वराची नावं आहेत, अशी ’हरिहरैक्यां’ची समन्वयवादी भूमिका
घेतली. त्यामुळं या दोन्ही संप्रदायांतील दुरावा व एकमेकांविषयीचा
भेदभाव नाहीसा झाला. त्याचं एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून
नरहरी महाराजांच्या जीवनाचा उल्लेख करायला हवा.

ज्ञानेश्वर माऊलींनी जी शैव आणि वैष्णव यांच्यामधील एकात्मतेची
अपेक्षा केली, ती नरहरी महाराजांनी प्रत्यक्ष आपल्या आचरणाद्वारे
पूर्ण केली. ते प्रारंभी कट्‍टर शिवोपासक होते. ’कटिसूत्र’ प्रसंगानंतर
ते वारकरी (विठ्ठलोपासक) झाले, कारण त्यांना शिव आणि विष्णू
यांच्यामधील अभेद जाणवला.

ज्या ’कटिसूत्र’ (कडदोरा) प्रसंगानं नरहरी महाराजांना शिव आणि
विठ्ठल यांच्या मधील अभेद जाणवला, त्या ’कटिसूत्र’ प्रसंगाचं /
अख्यायिकेचं आकलन आपण करून घ्यायला हवं. त्यामुळं नरहरी
महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींची हरिहरैक्याची भूमिका का स्वीकारली,
याचा उलगडा हो‌ईल. ही घटना/ आख्यायिका अशी आहे –
देवगिरीच्या एका सावकारानं विठ्ठलमूर्तीला ’कटिसूत्र’ (कडदोरा) अर्पण
करायचं ठरविलं व ते काम त्यानं नरहरी महाराजांकडे सोपविलं.
महाराज कट्‍टर शैव असल्यानं ते विठ्ठल मंदिरात जात नव्हते. विठ्ठल
मूर्ती दर्शन त्यांना निषिद्ध वाटत होतं. त्यामुळं त्यांनी त्या सावकारालाच
मूर्तीच्या ’कटिसूत्रा’चं माप आणायला सांगितल. त्यानुसार नरहरी
महाराजांना त्या सावकारानं माप आणून दिलं. नरहरी महाराजांनी
त्यानुसार ’कटिसूत्र’ तयार केलं. पण ते चार बोटं सैल झालं.
मग, सावकाराने महाराजाना स्वत: माप घेण्याविषयी आग्रह केला.
पण विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं नाही म्हणून स्वत: नरहरी महाराजांनी
डोळ्यांवर पट्‍टी बांधून मूर्तीच्या ’कटिसूत्रा’चं माप घे‌ऊ लागले.
तेव्हा विठ्ठलमूर्ती ही शिवमूर्ती आहे, असं त्यांना जाणवलं.
तेव्हा डोळ्यांवरील पट्‍टी काढल्यावर पुन्हा ती विठ्ठलमूर्तीच असल्याची
प्रचिती त्यांना आली. त्यामुळं ’हरी’ आणि ’हर’ हे एकच आहेत,
हे चिरंतन सत्य त्यांना जाणवलं. त्याविषयी ते पुढील अभंगात म्हणतात.

शिव आणि विष्णू एकचि प्रतिमा । ऐसा ज्याचा प्रेमा सदोदित ॥
धन्य ते संसारी, नर आणि नारी । वाचे ’हर हरी’ उच्चारीती ॥
नाही पैं भेद, अवघा मनीं अभेद । द्वेषाद्वेष- संबंध उरी नुरे॥
सोनार नरहरी न देखे द्वैत । अवघा मूर्तिमंत एकरूप ॥

भाषिक व ऐतिहासिक प्रमाणांच्या आधारे चिकित्सा केल्यावर नरहरी
महाराजांच्या उपलब्ध अभंगांची संख्या चाळीस ते पन्नास अभंग
इतकीच असावी असं मानलं जातं. मौखिक परंपरांचा आणखी
धांडोळा घेतल्यास आणखी भर पडू शकेल, असं अनुमान करता येतं.
असं असूनही नरहरी महाराजांची उपलब्ध असलेली निर्मिती
अल्प असूनही तिनं आपलं वैशिष्ट्य नि वेगळंपण सिद्ध केलं आहे.

आपला व्यवसाय व संसार चांगल्या प्रकारे करीत असताना नरहरी
महाराजांनी आत्मचिन्तन केलं नि आत्मशोध घेण्याचा प्रयत्न केला.
त्या वेळी त्यांना कशाची प्रचिती आली ?

जग हे अवघें सारें ब्रह्मरूप । सर्वांभूती एक पांडुरंग ॥
अणुरेणुपर्यंत ब्रह्म भरियेलें । सर्वांघटीं राहिलें अखंडित ॥
विश्व हें व्यापिलें भरूनी उरलें । कवतुक दाविलें मायाजाळ ॥
भ्रांती मायाजाळ काढता तात्काळ । परब्रह्मीं खेळे अखंडित ॥
अखंडित वस्तु हृदयी बिंबली । गुरुकृपे पाही नरहरी ॥

ही जाणीव म्हणजेच ज्ञानदेवांनी ’ज्ञानेश्वरी’त प्रतिपादिलेला
’चिद्विलासवाद’ होय. नरहरी महाराज हे नाथ सांप्रदायी असून
त्यांना प्रत्यक्ष गहिनीनाथांनीच अनुग्रह दिला होता असे परंपरा
मानते.

कौटुंबिक पार्श्वभुमी –
श्री संत नरहरी महाराजांचा जन्म पंढरपुर येथे सवंत शके १११५
श्रावण मास शुक्ल पक्ष त्रयोदशी बुधवार रोजी प्रात:काळी झाला.
त्यांच्या वडिलांचे नाव अच्युतबाबा तर आईचे नाव सावित्रीबाई
असे होते. पंढरी येठेच ते सोनार कामाचा व्यवसाय सचोटीने
करीत असत. उत्तम कारागीर म्हणू त्यांची ख्याती होती. घरात
परंपरागत शीव उपासना होती व घरातच शीव मंदिरही होते.
रामचंद्रदास कृष्णदास हरिप्रसाद मुकुंदराज मुरारी अच्यूत आणि
नरहरी अशी त्यांची वंशपरंपरा सांगण्यात येते. त्यांच्या पत्नीचे नाव
गंगा व मुलांची नावे नारायण व मालू अशी होती.

संसार करता कराताच संत समागम, नाम चिंतन करत त्यांनी
परमेश्वराची प्राप्ती करुन घेतली.
नरहरी महाराजांनी शके १२३५ माघ वद्य तृतिया सोमवार
इसवी सन १२८५ रोजी पंढरपुर येथेच समाधी घेतली.
आजही पुंडलीकाचे दर्शन घेवून आपण विठ्ठल मंदिराकडे
जावू लागलो की मंदिराजवळच डाव्या बाजूला नरहरी
महाराजांचे समाधी मंदिर आपल्याला पहायला मिळते.

– देवदत्त परुळेकर मो. ९४२२०५५२२१

वै. विष्णुबुवा जोग महाराज

Jog Maharaj Newविष्णुबुवा जोग महाराज यांची आज पुण्यतिथी (गुरुप्रतिपदा)
त्यांना भावपूर्ण आदरांजली.

ते नाशिकला रामकुंडावर स्नानासाठी गोदावरीमध्ये उभे राहिले. तीरावरील
तीर्थोपाध्याय संकल्प सांगू लागला –
” पापोहं पापकर्माहं पापात्मा पापसंभव: ॥
बुवा एकदम त्याच्यावर खेकसले.
“मी पापीही नाही, पापकर्मीही नाही ! दुसरे काय म्हणायचे असेल ते म्हणा,
एवढा हा संकल्प उच्चाराल, तर खबरदार !”
कोण होते हे बुवा ? या दुर्लभ संत पुरुषाला विष्णुबुवा जोग या नावाने
ओळखतात. त्यांचा हा अल्प परिचय –

विष्णु नरसिंह जोग (जन्म : १४ सप्टेंबर १८६७, मृत्यू ५ फेब्रुवारी १९२०)
हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे कार्य पद्धतशीरपणे पुढे नेण्याचे प्रयत्न करणारे
संतपुरुष होते. विष्णुबुवा जोग म्हणून हे सर्वपरिचित आहेत.
ते आळंदीतील वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार
आणि लेखक होते. विष्णुपंत जोग हे अत्यंत निरिच्छ होते आणि
लोकमान्य टिळक यांचे स्नेही व चहाते होते. ते स्वदेशी वस्तू वापरीत
आणि टिळकांना यथाशक्ती मदत करीत.

विष्णुबुवांचा जन्म पुण्यात झाला. त्यांच्या आ‌ईचे नाव सरस्वती होते.
त्यांना तीन मोठे भा‌ऊ होते. त्यांतील एक पांडोबा महाराज हे मल्ल होते.
विष्णुबुवांनाही लहानपणापासून मल्लविद्येचा नाद होता. पांडोबांप्रमाणे तेही
आजन्म ब्रह्मचारी राहिले. विष्णुबुवा पुण्यातील नगरकर तालमीचे वस्ताद होते.

पांडोबा महाराजांबरोबर विष्णुबुवा आळंदीला जा‌ऊन लागले. हळुहळु ते
ज्ञानेश्वर माऊली व पांडुरंगाचे नि:स्सीम भक्त झाले.
त्यांनी तुळसिची माळ ज्ञानेश्वरांच्या समाधीवर ठेवली. ती माळ स्वतःच
आपल्या गळ्यात घालून घेतल्री आणि ते वारकरी झाले.

विष्णुबुवा जोगमहाराज हे वारकरी संप्रदायाचे प्रसारक होते.
विष्णुबुवा फारसे शिकलेले नव्हते. त्याना स्वत:ची सही करायलाही दोन मिनीटे
लागत असत. पण संत कृपेने मराठी संतवाङ्मयाचे अनेक ग्रंथ त्यांनी
टिपा-प्रस्तावना-अन्वयार्थ लावून प्रसिद्ध केले.
तुकाराम महाराजांच्या अभंगांचा अर्थ लावून सार्थ गाथा तयार करण्याचे काम
पहिल्यांदा जोगमहाराजांनीच केले. इ.स. १९०१ साली त्र्यंबक हरि आवटे
यांनी प्रकाशित केलेली हीच ती तुकारामाची आद्य सार्थ गाथा.
जोग महाराजांनी संपादित केलेली अन्य पुस्तके
सार्थ अमृतानुभव (इ.स. १९०५).
निळोबा महाराजांचा व ज्ञानेश्वर महाराजांचा वर्गीकृत गाथा ( १९०७)
सार्थ हरिपाठ आणि चांगदेव पासष्टी
एकनाथी भागवतादी सहा ग्रंथ (१९११)
वेदान्तविचार (१९१५)
महीपतीकृत ज्ञानेश्वरीतील वेचे (सार्थ) (१९१७)

जोग महाराजांनी गावोगावी फिरून कीर्तने-प्रवचने दिली आणि आपल्या
अमोघ वाणीने संत वाङ्‌मयाचा प्रचार आणि प्रसार केला. भजन, कीर्तने,
ज्ञानेश्वरी आणि तुकारामाची गाथा यांची पारायणे आणि पंढरीची वारी हा
त्यांचा दिनक्रम बनला. कीर्तन-प्रवचनांनी त्यांनी महाराष्ट्र ढवळून काढला.

विष्णुबुवा अत्यंत नियमशील वारकरी होते. आचरण विशुद्ध, सत्यप्रियता,
देशभक्ती अशा अनेक गुणांनी जोगमहाराजांना समाजात मान होता, प्रतिष्ठा
होती. अनेकांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना होती.

जोगमहाराजांचे शिष्योत्तम वै. प्राचार्य सोनोपंत (मामा) दांडेकर यांनी
जोगमहाराजांचे चरित्र लिहून प्रसिद्ध केले आहे. मामांबरोबरच
वै. बंकटस्वामी, वै. लक्ष्मणबुवा इगतपुरीकर, वै. मारुतीबुवा गुरव,
वै. पांडुरंग शर्मा, वै. लक्ष्मणबुवा कुंडकर असे अनेक कतृत्ववान शिष्य
जोग महाराजांनी तयार केले. त्यांनी वारकरी सांप्रदायाचा मोठा प्रसार
केला. तसेच प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार वै. डॉ. दत्तोपंत पटवर्धन हे देखिल
जोग महाराजांचेच शिष्य होत.

जोग महाराजांच्या जीवनातील काही प्रसंग –
(वै. मामा दांडेकर यांनी लिहिलेल्या चरित्रच्या आधारे)

हरिकीर्तन करुन कुणी पैसे घेवू लागला की ते त्याच्यावर संतापत.
“तर मग पोट भरण्यासाठी मी काय करु ?” या प्रश्नावर ते लगेच
उत्तर करीत, “-वाटेल ते कर! हमाली केलीस तरी चालेल. पण
हरिनाम असे विक्रिस काढू नकोस.”

इंग्रजांची (सरकारी) नोकरी करणे या गोष्टीचा ते अतिशय तिटकारा करित.

तुकाराम महाराजांच्या म्हणण्या प्रमाणे –
आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत । करावे फजीत चुकती ते ॥
असे त्यांचे वर्तन होते. कुणी चुकीच्या मार्गाने जाऊ लागला, की
त्यांनी त्याला धरुन चमकावलाच. जाऊ दे, आपल्याला काय करायचे आहे,
अशी चालढकल त्यांच्याजवळ अजिबात नव्हती, ढोंग दिसले की आपली
काठी घेऊन ते त्याच्यावर तुटून पडलेच !
विदर्भातील एक तथाकथित साधू पुण्यास आले. त्यांनी अंतर्दुष्टीने एका
भल्या माणसाची विधवा ही गेल्या जन्मी आपलीच पत्नी होती, असे
ओळखले होते म्हणे ! पुण्यातील एका सत्प्रवृत्त देशभक्तांनीच त्यांचे
प्रस्थ वाढविण्यास प्रारंभ केला. बुवा उठले आणि दण्डा घेऊन त्या
साधूच्या मुक्कामी जाऊन उभे राहिले. त्यांनी त्या साधूला असे खडसावले,
की लगेच गाशा गुंडाळून तो जो पळाला, तो बुवा असे पर्यंत पुन: पुण्यास
आला नाही.

आपली सर्व संपत्ती बुवांनी वारकरी शिक्षण संस्थेला दिली.

बुवा स्वत: पत्र लिहीत नसत. कधी लिहिण्याचा प्रसंग आला तर
दुसऱ्याला सांगत. एकादा मामांवर पत्र लिहिण्याचा प्रसंग आला.
ते लिहीत असताना नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे पत्राच्या शेवटी ’आपला’
असे मामांनी लिहिले आणि बुवांपुढे सहीकरता कागद केला. बुवा
म्हणाले हे ’आपला’ खोड. आम्ही फक्त ज्ञानदेवाचे आणि देवाचे !
पुन: कधी मामांनी ’आपला’ असे बुवांच्या पत्रात लिहिले नाही.

आपला देह आळंदी येथेच अखेर ठेवायचा हा बुवांचा निर्धार होता.
त्याप्रमाणे ते आदल्या दिवशी निघून मामा दांडेकर व लक्ष्मणबुवा इगतपुरीकर
यांचेबरोबर पुण्याहून घोडा गाडीने आळंदीस आले. घांसवालेंच्या धर्मशाळेत
ते उतरले. मामांना इंद्रायणींचे व ज्ञानोबा माऊलींचे तीर्थ आणावयास
सांगितले. ते तीर्थ आणल्यावर जोग महाराजांनी ते प्राशन केले. जोग महाराज
उत्तरेकडे तोंड करुन मांडी घालून बसले. मामांना हाक मारली व डोळे
मिटून मी जातो असे म्हटले. माऊलीच्या चिंतनात ते अनंतात विलीन झाले.
ज्ञानेश्वरीत वर्णन केल्याप्रमाणे त्यांनी देह ठेवला.
का झांकलीये घटीचा दिवा । नेणिजे काय जाहला केव्हां ।
या रिती तो पांडवा । देह ठेवी ॥ ज्ञा. ८-९८ ॥

– देवदत्त परुळेकर मो. ९४२२०५५२२१

मंत्र दिला राम कॄष्ण हरि

Tukoba

आज माघ शुद्ध दशमी. वारकरी सांप्रदायात या तिथीला विशेष महत्व
दिले जाते. कारण या दिवशी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांना गुरुकॄपा
होवून “राम कॄष्ण हरि” या महामंत्राची प्राप्ती झाली.
खुद्द तुकाराम महाराजांनी आपला अनुभव कथन केला आहे तो असा-

सत्यगुरुरायें कॄपा मज केली । परि नाहीं घडली सेवा कांही ॥१॥
सांपडविलें वाटे जातां गंगास्नाना । मस्तकीं तो जाणा ठेविला कर ॥२॥
भोजना मागती तूप पावशेर । पडिला विसर स्वप्नामाजी ॥३॥
काय कळे उपजला अंतराय । म्हणोनियां काय त्वरा झाली ॥४॥
राघवचैतन्य केशवचैतन्य । सांगितली खूण माळीकेची ॥५॥
बाबाजी आपुले सांगितलें नाम । मंत्र दिला राम कॄष्ण हरि ॥६॥
माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार । केला अंगीकार तुका म्हणे ॥७॥

तुकाराम महाराज सांगतात-
गुरुमहाराजांनीं माझ्यावर कृपा केली, हे खरे आहे. गुरुरायांनी माझ्यावर
सत्य कॄपा केली. तसेंच ज्या गुरुनें माझ्यावर कॄपा केलीं, ते गुरुराज
सत्य आहेत. परंतु माझ्याकडून कांही त्यांची सेवा घडली नाहीं.

मी स्वप्नामध्यें गंगेचे स्नान करण्याकरितां जात असतांना श्रीगुरुंनी मला
वाटेत सापडविलें म्हणजे गाठले आणि दर्शन दिले. मी नमस्कार
केल्याबरोबर माझ्या मस्तकावर त्यांनी अभयकॄपा हस्त ठेवला, असें
तुम्ही जाणून घ्या.

त्यांनी भोजनासाठी माझ्याजवळ पावशेर तूप मागितले. परंतू मला त्याचा
विसर पडला. हे सर्व स्वप्नात घडले. माझ्याकडून सेवेत कांही अंतर
पडले कीं काय? कोण जाणे, म्हणून त्यांनी जाण्याची त्वरा केली. राघव
चैतन्य, केशव चैतन्य अशी आपल्या गुरु परंपरेची खूण त्यांनी मला
सांगितली. स्वत:चे नाव बाबाजी असे सांगून त्यांनी मला “राम कॄष्ण हरि”
हा मंत्र दिला. या दिवशी माघ शुद्ध दशमी, गुरुवार हा पुण्यदिवस होता.
तो पाहूनच त्यांनी माझा स्विकार केला. ( योगायोगाने यावर्षी माघ शुद्ध
दशमी ही तिथी गुरुवारी आली आहे.)

तुकाराम महाराजांनी ज्या गंगेच्या स्नानाला जाणारी वाट असा उल्लेख
केला आहे ती गंगा कोणती? ग्रामीण भागात आजही आपल्या गावा
जवळील नदीला आदराने आणि प्रेमाने गंगा असेच म्हणतात. गोदावरी
काठावर रहाणारे लोक गोदावरीला गंगाच म्हणतात. संत जनाबाई म्हणतात-
भीमा आणि चंद्रभागा । तुझ्या चरणीच्या गंगा ॥
म्हणुन देहू जवळील नदी इंद्रायणी हिच नदी ही गंगा असावी असे
मानतात.
श्री. वा. सी. बेंद्रे यांच्या मते हा गुरुपदेश तुकोबांना ओतुर या गावी
गंगावाट नावाच्या वाटेस तुकोबा असताना झाला. सद्गुरुंच्या स्पर्शाने
तुकोबांना भावावस्था प्रप्त झाली असावी असाही स्वप्नाचा अर्थ
त्यांनी केलेला आहे. या भावानंदात तुकोबा पुर्णपणे मग्न झाले
असल्यामुळे खूप वेळ झाला तरी त्यांना जाग आली नाही. एवढ्यात
बाबाजी चैतन्य निघून गेले. मग सावध झाल्यानंतर तूप द्यायचे
विसरून राहून गेले म्हणून तुकारामबुवांना वाईट वाटले. साधु,
संन्याशी, बैरागी यांना तुप देण्याची प्रथा असे. तुकोबांचा हा
गुरुपदेश इंग्रजी कालगणनेप्रमाणे २३ जानेवारी १६४० या दिवशी
झाला असल्याचे बेंद्रे यांनी म्हंटले आहे.
डॉ. प्र. न. जोशी यांचे प्रतिपादन असे –
राघव चैतन्यांचे मूळचे नांव रघुनाथ. गिरिनारच्या एका भागात
शौर्यकुळात यांचा जन्म झाला. वडिलांच्या आज्ञेवरून रघुनाथाने
श्रीदत्ताची उपासना केली. दत्ताच्या अनुग्रहानंतर त्यांच्याच
प्रेरणेवरून हे जुन्नर जवळच्या ओतुरच्या डोंगरात व तपोवनात
अनुष्ठान करु लागले. पुष्पावती नदीच्या तीरावर शिवाची कडक
उपासना यांनी केली. शेवटी व्यासांनी यांना दर्शन दिले व
यांचे नाव राघव चैतन्य असे ठेऊन ’ॐ नमो भगवते वासुदेवाय’
हा मंत्र दिला. दत्तानेही चतु:श्लोकी भागवताची शिकवण देऊन
संप्रदाय वाढविण्यास सुचविले. त्यांचा संचार महाराष्ट्र, उत्तर
हिंदुस्थान, तेलंगण इत्यादि भागात नेहमी असे.
केशव चैतन्य हे राघव चैतन्यांचे प्रमुख शिष्य होत. यांचा जन्म
राजर्षी कुळात झाला. हा मोठा राजकारणी व शुर असून यांस
राघव चैतन्यांच्या सहवासांत वैराग्याचे महत्व पटले. राघव
चैतन्यांकडून गुरुदीक्षा मिळाल्यानंतर यांचे नांव केशव चैतन्य
म्हणून प्रसिद्ध झाले. सन १५६२ च्या सुमारास राघव चैतन्यानी
जिवंत समाधी घेतली. त्यानंतर केशव चैतन्य हे ओतुर परिसरात
राहत असत व तेथे गंगावाटेवर त्यांचा मठ असे. त्यांना मोठा
शिष्य परिवार लाभला. सन १५७१ मध्ये त्यांनी समाधी घेतली.
राघव चैतन्य यांनी ब्रह्मस्वरुप, योगनिद्रा, त्रिगुणलीला इत्यादि
अनेक ग्रंथांची रचना केली. तर केशव चैतन्य यांनिही भक्तिप्रकाश,
वैकुंठपद, गीताभागवतसार अशा ग्रंथांची रचना केली आहे.

बाबाजी चैतन्य हे केशव चैतन्य यांचे प्रमुख शिष्य होत. यांचा
मान्यहाळीसही एक मठ असे. यांची उपासना भक्तीप्रधान होती. मुख्य़
म्हणजे या तिघांनाही अनेक हिंदू मुसलमान शिष्य मिळाले. मुसलमान
परंपरेत राघव चैतन्यांना हजरत लाडले मकायकही उर्फ राघव दराज
आलंद शरीफ या नावाने, केशव चैतन्यांना हजरत ख्वाजा बंदे नवाज
व बाबाजी चैतन्यांना हजरत शेख शहाब्बुद्दिन साहेब मान्यहाळ अशा
नावांनी प्रसिद्धी होती, असे डॉ. प्र. न. जोशी म्हणतात.

निरंजन बुवांनी लिहिलेल्या ’चैतन्य कल्पतरु’ या ग्रंथात तुकोबांची
गुरु परंपरा श्रीविष्णु-ब्रम्हदेव-नारद-व्यास-राघव चैतन्य-
केशव चैतन्य-बाबाजी चैतन्य-तुकोबा चैतन्य अशी सांगितली आहे.

अभंगातील काही शब्दांचा परंपरेत पारमार्थिक भावार्थ सांगण्यात येतो
तो असा –
ज्या गंगेचा उल्लेख अभंगात आहे ती गंगा म्हणजे भक्तिगंगा
किंवा ज्ञानगंगा होय. तिच्यात स्नानाला जायची वाट सापडली नाही
तर संत कॄपेने सापडविली म्हणजे संतांनी दाखविली. या वाटेवरून
महाराज चालले होते यावरून गुरुकॄपेपूर्वी तुकाराम महाराज काय
साधना करत होते व याच मार्गावर त्यांना सद्गुरुची कशी प्राप्ती झाली
हे स्पष्ट होते.
गुरुदेवानी तुप मागितले म्हणजे स्नेहयुक्त अंत:करण मागितले.
अंत:करणाचे चार भाग मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. यातील पाव
भाग म्हण्जे परमार्थाचे मुख्य साधन चित्त तेच मागितले.
माघ म्हणजे मा=नाही अघ=पाप म्हणजे पवित्र आणि दशमी म्हणजे
पंच कर्मेंद्रियांचा व पंच ज्ञानेंद्रिये अशा दहा इंद्रियांचा हा पवित्र
देह पाहून गुरु कॄपेस योग्य समजून बाबाजी चैतन्यांनी तुकाराम
महाराजांना गुरुपदेश केला. गुरुंनी शिष्याच्या मनातील भाव जाणून
त्याला सोपा आणि आवडिचा मंत्र सांगितला. तोच तुकाराम महाराजांनी
सर्वांसाठी खुला केला – राम कॄष्ण हरि.

– देवदत्त परुळेकर मो. ९४२२०५५२२१

देव तिळीं आला

आपण सण साजरे करतो ते केव्हा? सण विशीष्ठ दिवशी साजरे केले
जातात. त्याचा संबंध कालगणनेशी आहे. वर्षाची सुरवात चैत्र शुद्ध
प्रतिपदा या दिवशी गुढी पाडवा, फाल्गुन पौर्णिमेला होळी, आश्विन
शुद्ध दशमीला दसरा, आश्विन कॄष्ण चतुर्दशीला दिवाळी साजरी केली जाते.
पण संतांच्या घरचे सण काही वेगळेच आहेत. तुकाराम महाराज म्हणतात
दसरा दिवाळी तोचि माझा सण । सखे हरिजन भेटतील ॥

सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, दक्षिणायन संपून उत्तरायण सुरु होते तो
पर्वकाळ म्हणजे मकर संक्रमण अर्थात मकर संक्रांत हा सण. या दिवशी
आपण एकमेकाला तिळगूळ देतो आणि म्हणतो, “तिळगूळ घ्या आणि
गोड बोला.” एकमेकात सौख्य, स्नेह वाढविणारा हा गोड सण.

आता तुकाराम महाराज या सणाचे वर्णन कसे करतात पाहा –

देव तिळीं आला । गोडें गोड जीव धाला ॥१॥
साधला हा पर्वकाळ । गेला अंतरीचा मळ ॥२॥
पापपुण्य गेलें । एका स्नानेंचि खुंटले ॥३॥
तुका म्हणे वाणी । शुद्ध जनार्दन जनीं ॥४॥

तिळ हे स्नेहाचे, प्रेमाचे, भक्तिचे प्रतिक मानले आहे. तो स्निग्ध आहे.
’देव तिळीं आला’ म्हणजे देव आमच्या प्रेमात आला. आमच्या भक्तिच्या
अधिन झाला. याचा परिणाम काय झाला? ’गोडें गोड जीव धाला.’
यामुळे मुळचाच गोड-सुखरुप असलेला जीव देवाच्या गोडीने-सुखाने
तॄप्त झाला.

मराठी भाषा मोठी गमतीदार आहे.
’गोड’ ही एक रुचि आहे. पण गोड हा शब्द आपण कसा कसा वापरतो
पाहा.
’जेवण मोठे गोड होते हो.’ जेवणात भात, आमटी, पापड, चटणी,
भजी, कोशिंबीर असे अनेक पदार्थ होते. प्रत्येकाची चव वेगळी पण
आपण म्हणतो जेवण मोठे गोड होते.
एखादे छोटे बाळ पाहून आपण म्हणतो ’किती गोड बाळ आहे.’
एखाद्या सुंदर युवतीचा चेहरा पाहून म्हणतो ’किती गोड मुलगी आहे.’
लताचे गाणे ऐकून म्हणतो ’किती गोड गळा आहे.’

आपण गोड खातो तसे गोड बोलावेही. कारण शब्द गोड असतात तसे
कटूही असतात. शब्द मॄदु असतात तसे कठीणही असतात.
ज्ञानेश्वरीतील शब्द कसे आहेत -’शब्द जैसे कल्लोळ अमॄताचे’
अमॄतासारखे गोड शब्द.

आपण असेही म्हणतो ’आजचा दिवस मोठा गोड झाला.’
किंवा असेही म्हणतो ’थोडे भांडण झाले खरे पण शेवट अखेर
गोड झाला.

देवाचे वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात-
गोड तुझे रुप गोड तुझे नाम ।
नामदेवराय देवाच्या नामाचे वर्णन करतात-
अमॄताहूनी गोड नाम तुझे देवा ।

अर्थात गोड म्हणजे चांगले, सुंदर, सुखकारक, आनंद देणारे.
संतांनी ’बरवा’ हा शब्दही याच अर्थाने वापरला आहे.
नामदेवरायांचा हा गोड अभंग पाहा –

नाम बरवे रुप बरवे । दरुशन बरवे कानडीयाचे ॥
नामा म्हणे तुझे अवघेची बरवे । त्याहूनी बरवे प्रेम तुझे ॥

असा देव बरवा आहे, सुंदर आहे, गोड आहे, सुखरुप आहे,
आनंदघन आहे.

म्हणून ज्ञानेश्वर माऊली वर्णन करतात-
सर्व सुखाचे आगर । बापरखुमादेवीवर ॥

तुकाराम महाराज तर विचारतात –
सुखरुप ऐसे दुजे कोण सांगा । माझ्या पांडुरंगावाचोनी ते ॥

परमात्मा सुखरुप आहे म्हणजेच गोड आहे. जीव हा मूळात परमात्म
स्वरुपच असल्याने गोडच आहे. जीव आणि देव मुळात भिन्न नाहितच.
देवच जीवभाव धारण करुन स्वत:च भक्त झाला आहे.
तुकाराम महाराज म्हणतात –
देव भक्त तूंचि झालासी दोन्ही । वाढावया सुख भक्ति हे जनीं ।
जड जीवां उद्धार व्हावया लागोनि । शरण तुका वंदीं पाउलें दोन्ही ॥
भक्तीचा खेळ करण्यासाठी देव आणि भक्त हे काल्पनिक द्वंद्व कल्पिले.
पण भक्तित अखेर देव आणि भक्त वेगळे राहत नाहित.
देव आणि भक्त । नाही दुजा विचार ॥
देव पहायला गेलेला भक्त हा देवच होतो. तुकाराम महाराज म्हणतात-
देव पहावया गेलो । तेथे देवची होवूनी ठेलो ।

अशाप्रकारे मुळच्या गोड असलेल्या जीवाला देवाची गोडी प्राप्त झाली.
तो तॄप्त झाला.

मकर संक्रांत हा पर्वकाळ म्हणजे पूण्यकाळ मानला आहे. पर्वकाळात
तिर्थात स्नान करावे असा संकेत आहे. तिर्थात स्नान केल्याने पापनाश
होतो असाही संकेत आहे.
देव तिळी आल्याने हा पर्वकाळ साधला गेला असे तुकाराम महाराज
पुढे वर्णन करतात.

साधला हा पर्वकाळ । गेला अंतरीचा मळ ॥२॥

हा पर्वकाळ साधला गेल्याने माझ्या अंत:करणातील मळ हा दोष
नाहिसा झाला असे तुकाराम महाराज म्हणतात.
आपल्या चित्तातील पाप वासना म्हणजेच मळ हा दोष होय. ही पाप
वासना संपूर्ण नष्ट करण्याचे सामर्थ्य नामस्मरणात्मक भक्तित आहे.
ज्ञानेश्वर माऊली म्हणतात –
हरि उच्चारणीं अनंत पापराशी । जातील लयासी क्षणमात्रे ॥
भक्तिमार्गात संत महात्म्यानी नाम संकीर्तनाने सर्व पाप कसे नाहिसे
केले आहे याचे सुंदर वर्णन ज्ञानेश्वरीत आले आहे ते असे –

तरी कीर्तनाचेनि नटनाचे । नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे ।
जें नामचि नाहीं पापाचें । ऐसें केलें ॥ १९७ ॥
यमदमा अवकळा आणिली । तीर्थें ठायावरूनि उठविलीं ।
यमलोकींची खुंटिली । राहाटी आघवी ॥ १९८ ॥
यमु म्हणे काय यमावें । दमु म्हणे कवणातें दमावें ।
तीर्थें म्हणतीं काय खावें । दोष ओखदासि नाहीं ॥ १९९ ॥
ऐसें माझेनि नामघोषें । नाहींचि करिती विश्वाचीं दुःखें ।
अवघें जगचि महासुखें । दुमदुमित भरलें ॥ २०० ॥

मनातील पाप वासना पूर्ण नष्ट व्हायची असेल तर तिचे मूळाशी
असलेले काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे सहा विकारही
नाहिसे व्हायला हवेत. हे विकार मोठे प्रबळ आहेत. उदाहरणार्थ
काम आणि क्रोध या प्रबळ विकारांचे वर्णन करताना माऊली म्हणतात-

हे विषय दरिचे वाघ । ज्ञाननिधीचे भुजंग ।
भजन मार्गीचे मांग । मारक जे ॥

आपल्या तप सामर्थ्याने भर माध्यानीचा सूर्य जो झाकू शकतो तो
वेदज्ञ तपस्वी पराशर काम वासनेवर विजय मिळवू शकत नाही.
ज्ञानी राजा परिक्षितीला क्रोधावर विजय मिळवता न आल्याने
मॄत्यूदंडाची शिक्षा भोगावी लागते.

तुकाराम महाराज म्हणतात –
संन्यासी तापसी ब्रह्मचारी । होता दिगांबर निस्पॄही वैराग्यकारी ।
कामक्रोधें व्यापिले भारी । इच्छेकरी न सुटती ॥

या कामक्रोधादी विकारांचा नाशही नामस्मरणाने होतो.
तुकाराम महाराज म्हणतात –
राम म्हणता कामक्रोधांचे दहन । होय अभिमान देशधडी ॥

तुकाराम महाराजांना मंबाजीने ऊसाने बडवले तरी महाराजांना क्रोध
आला नाही. महाराजांची परिक्षा पहाण्यासाठी काही कुटाळांनी एका
सुंदर वेश्येला महाराजांकडे पाठविले. तीने महाराजांचे मन जिंकण्याचे
खूप प्रयत्न केले. पण तिला यश आले नाही. उलट तिला वंदन करून
महाराज म्हणाले –
जाई वो तू माये न करि सायास । आम्ही विष्णूदास तैसें नव्हे ॥

कारण तुकाराम महाराजांच्या तिळी देव आला होता. तुकाराम महाराज
म्हणतात –
तुका म्हणे देह भरिला विठ्ठले । कामक्रोधें केले घर रिते ॥

भक्तिगंगेतील या स्नानाचे वर्णन महाराज पुढे करतात –

पापपुण्य गेलें । एका स्नानेंचि खुंटले ॥३॥

भक्तिगंगेतील या एकाच स्नानाने संचित पाप-पुण्ये नष्ट झाली
आणि क्रियमाण पाप-पुण्ये खुंटली म्हणजे लागेनाशी झाली आहेत,
असे तुकाराम महाराज म्हणतात.

प्रारब्धाचा भोग कुणाला चुकविता येतो काय ? मग तुकाराम महाराज
असे कसे म्हणतात?
प्रारब्धाचा भोग हरिकॄपेने नष्ट होतो असे एकनाथ महाराज म्हणतात.
एकाजनार्दनी भोग प्रारब्धाचा । हरिकॄपे त्याचा नाश असे ॥
भक्ती पुर्णत्वाला गेली की भक्ताला प्रारब्ध, संचित, क्रियमाण यांची
काही पिडा होत नाही असे तुकाराम महाराजांनी स्पष्ट केले आहे.
प्रारब्ध क्रियमाण । भक्ता संचित नाहीं जाण ॥

आता देव अंतरी प्रकट झाल्यावर आपण स्वत: देवरुपच झाल्यावर
लोकांशी आपला व्यवहार कसा राहिला आहे हे तुकाराम महाराज
अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात.

तुका म्हणे वाणी । शुद्ध जनार्दन जनीं ॥४॥

तुकाराम महाराज म्हणतात माझी वाणी शुद्ध झाली असून
“जन हे जनार्दनच आहेत” असे जाणून ती प्रेमाने गोड बोलत आहे.

नामस्मरणाने वाणी शुद्ध पवित्र पुण्यवंत होते असे तुकाराम महाराज
म्हणतात.
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत । जो वदे अच्युत सर्वकाळ ॥

आपल्यासह सर्वत्र तो एकटा परमात्माच भरलेला आहे ही परम
अनुभुती होय. सर्व संतांना ही अनुभुती आली. ज्ञानेश्वर महाराज
म्हणतात –
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ।
नाथबाबा वर्णन करतात –
माय जगन्नाथ बाप जगन्नाथ । अनाथांचा नाथ जनार्दन ॥
तुकाराम महाराज म्हणतात –
विठ्ठल विस्तारला जनीं । सप्तही पाताळें भरुनि ।
विठ्ठल व्यापक त्रिभुवनीं । विठ्ठल मुनि मानसीं ॥

सर्वत्र परमात्मा आहे असे जाणून आपण सर्वांशी प्रेमाने वागावे
आणि प्रेमाने गोड बोलावे हीच खरी संक्रांत, हेच खरे संक्रमण होय.
हाच खरा मकर संक्रांत साजरा करण्याचा उद्देश होय.
Dev tili ala